शांतिब्रम्ह

संत श्री एकनाथ महाराज संस्थान, पैठण

कार्यालय :: बाहेरील नाथमंदिर , श्रीक्षेत्र पैठण , जि. औरंगाबाद . फोन :: ( ०२४३१) २२३६०२
भक्तांन मार्फत देणगी स्वीकारली जाईल. खाते क्र. :- ५२०२२९३२७७१ आय. एफ. एस. सी.:- SBIN0020014(स्टेट बँक ऑफ इंडिया)


जीवनगाथा

संत एकनाथांचा जन्म एका खानदानी देशस्थ ब्राम्हणाच्या घरात इ.सन १५३३ पैठणात झाला. त्यांच्या आईचे नाव रूक्मिणी व वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. परंतु एकनाथांच्या दुर्दैवानेच ते तान्हे मूल असताना त्यांचे आईवडील देवाघरी निघून गेले, तेव्हा त्यांचा सांभाळ त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी केला. चक्रपाणी यांचे वडील म्हणजेच एकनाथांचे पणजोबा संत भानुदास हे विठ्ठल भक्त होत. एकनाथ लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते. वयाचे सहाव्या वर्षी त्यांच्या आजोबांनी त्यांची मुंज करून त्यांना शिक्षण देण्यासाठी एका विद्वान पंडितांची नेमणूक केली. त्या पंडिताकडून त्यांनी रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव वगैरे ग्रंथांचा अभ्यास केला. कारण ईश्वरभक्तीचे वेड त्यांना उपजतच होते. बालवयातच ते गुरूच्या शोधात निघाले आणि दौलताबादेच्या किल्ल्यात असलेल्या जनार्दन स्वामींच्या म्हणजेच आपल्या गुरूसमोर हात जोडून उभे राहिले. तो दिवस होता फाल्गुन वद्य षष्ठीचा. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता । चरणी जगन्नाथा चित्त ठेविले । माय जगन्नाथ बाप जगन्नाथ । अनाथांचा नाथ जनार्दन । एका जनार्दनी एकपणे उभा । चैतन्याची शोभा शोभतसे । भगवतोत्तम, शांतीब्रह्म असलेल्या संत एकनाथांना दत्तात्रेयांनी आपल्या मूळ रूपात दर्शन दिले होते. या अप्रतिम दर्शनाचे वर्णन नाथांनी आपल्या एका आरतीमधून केले होते. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा…. समाधि न ये ध्याना… हरली भवचिंता।।

नाथांचा जन्म संत भानुदासांच्या कुळामध्ये देशस्थ ऋग्वेदी आश्वलायन ब्राह्मण कुटुंबात झाला. स्वामी प्रत्येक गुरुवारी किल्ल्याच्या शिखरातील गुहेत दत्तवध्यान करीत. एके दिवशी स्वामी ध्यानात असताना परकीयांचे आक्रमण झाले. सद्गुतरुंची समाधी भंग होऊ नये म्हणुन नाथ हाती तलवार घेवून घोडयावर स्वार झाले. लढाई केली आणि शत्रुंचा पराभव केला. निस्सिम सेवेने नाथ दत्ता त्रय दर्शनास पात्र झाल्याचे पाहुन शुलिभंजन पर्वतावर त्यांना पहिले दत्तयदर्शन स्वामींनी घडविले. पुढे तीर्थयात्रा करुन नाथ पैठणास पोचले. सद्गुरुंच्या आदेशाप्रमाणे पैठण येथेच वास्तव्य करुन नाथ गृहस्थाश्रमात प्रवेश करते झाले. नाथांची पत्नी गिरिजाबाई ह्या सुशील आणि तत्पर होत्या. त्यांना तीन अपत्ये झाली. गोदा, हरिपंडीत व गंगा. नाथांचा प्रपंच व परमार्थ हे दोन्हीही फुलू लागले. संस्कृतातील ज्ञान सर्वसामान्यांना कळावे या उद्देशाने त्यांनी ते मराठीत सांगण्यास सुरुवात केली. त्यावरुन त्यांना अनेकांचा विरोध सहन करावा लागला. परंतु त्यास न जुमानता लोकोद्धारार्थ नाथांनी लोकांच्याच भाषेत भारुडादींच्या मार्गाने लोकांना परमार्थमार्गास लावले. लोकोद्धारासाठी वाङमयाच्या व आचरणाच्या माध्यमातून त्यांनी अनेक लोकोपयोगी कार्य केले. देवाचे नाम घेण्याचा अधिकार स्त्री शूद्रादी सर्वांना आहे असे वारंवार सांगितले. अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे पैठणकरांनी अनेकप्रकारे नाथांना त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु नाथांनी त्यांचा कधीही तिरस्कार केला नाही. त्यांनी आपल्या आचरणाने शांती व भक्तीचा प्रचार केला. त्यांनी अनेक ग्रंथांची रचना केली. नाथांची भक्ती पाहून भगवान श्रीकृष्ण ३६ वर्षे श्रीखंड्या, केशव व विठ्ठल नावाने नाथांघरी राबला. भगवान दत्तात्रयांनी नाथांच्या दारी द्वारपाल म्हणुन काम केले. नाथवाड्यात नित्य कीर्तन प्रवचनादी रोज होत असत. नाथ सर्वसंतात श्रीमंत असल्याकारणाने येणाऱ्या प्रत्येकास रोज ओंजळभर साखर वाटत असत. साखरेच्या आशेनेतरी लोकांच्या कानी चार चांगले शब्द पडतील ही त्यामागची धारणा. सर्वांना देवाकडे जावं वाटतं परंतु देवास नाथांकडे यावसं वाटलं. कर्नाटकातील एका सावकाराने बनविलेली श्रीविजयी पांडुरंगाची मूर्ती म्हणु लागली मला नाथांची सेवा हवी आहे. तो सावकार ती मूर्ती घेवून पैठणला आला. नाथांनी अनुभुती घेवून त्या मूर्तीचा स्वीकार केला. भावार्थ रामायण लिहिण्यासाठी प्रत्यक्ष श्रीरामचंद्रांनी माझा पाठपुरावा केल्याचे नाथांनी लिहून ठेवले आहे. एक दिवस नाथ सर्वसामान्यांसारखे मरण पावले. लोक म्हणू लागले नाथ सर्वसामान्यांसारखेच गेले मग त्यांच्यात आणि आमच्यांत काय फरक? नाथ ताटीवर उठुन बसले म्हटले मी पुन्हा केव्हातरी जाईन. काही दिवसांनी फाल्गून वद्य षष्ठी शके (इ.स. १५३३ ते १५९९) हा दिवस नाथांनी जलसमाधीसाठी निश्चित केला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत नाथांनी लक्ष्मीतीर्थावर शेवटचे कीर्तन केले. कृष्णकमलतीर्थामध्ये नाभिपर्यंत पाण्यात जावून आत्मा ब्रह्मांडात विलीन केला. त्यांच्या पार्थिव देहावर हरिपंडीतांच्या हस्ते अग्नी देण्यात आला. दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी गरम राखेवर तुळशी आणि पिंपळाचे रोप उगवले. त्यावरच नाथपुत्र हरिपंडीतांनी चरण पादुकांची स्थापना केली. प्रतिवर्षी एकनाथषष्ठी उत्सवास पाच ते सात लाख भाविक पैठणमध्ये येतात. आजही जे भाविक नाथांचे मनोभावे दर्शन घेतात त्यांना नाथ शांती, भक्ती आणि श्रीमंती प्रदान करतात. कृष्णकमलातीर्थी चरण नाथांचे । उद्धरी जगाचे कलीदोष ॥ श्रीनिळोबा.