शांतिब्रम्ह

संत श्री एकनाथ महाराज संस्थान, पैठण

कार्यालय :: बाहेरील नाथमंदिर , श्रीक्षेत्र पैठण , जि. औरंगाबाद . फोन :: ( ०२४३१) २२३६०२
भक्तांन मार्फत देणगी स्वीकारली जाईल. खाते क्र. :- ५२०२२९३२७७१ आय. एफ. एस. सी.:- SBIN0020014(स्टेट बँक ऑफ इंडिया)

कार्य व चमत्कार


1) पैठण येथील काही कुटाळ लोकांच्या सांगण्यावरुन एक यवन (मुसलमान) नाथांच्या अंगावर १०८ वेळा थुंकला तरीही नाथांना क्रोध आला नाही. उलट पान खाल्यानं तुझं तोंड भाजलं असेल घरी चल तुला मध चाखतो म्हणजे तुझ्या तोंडाचा दाह शांत होई असे सांगुन नाथांनी आपल्या आचरणाने शांतीचा संदेश आपणास दिला तसेच सत्याग्रह कसा असावा याचा वस्तुपाठही घालून दिला.

2) काशीहून रामेश्वरास वाहण्यात येणाऱ्या कावडीतील पाणी नाथांनी पाण्याविना तडफडत असलेल्या गाढवाच्या मुखात घातले व देव देवळात नसून तो चराचरात आहे हे सांगितले त्याचप्रमाणे प्राणीमात्रांवर दया करावी हेही त्यांनी आपल्या आचरणाने दाखवून दिले.

4) नाथ वाळवंटातून जात असता हरिजनाचे एक मूल तापलेल्या वाळूत रडत असल्याचे त्यानां दिसले. कोणताही स्पृश्य अस्पृश्यतेचा विचार न करता नाथांनी त्या बालकास कडेवर घेतले व त्याच्या घरी जावून त्याच्या आईकडे सुपुर्द केले. या घटनेतून नाथांनी आपल्याला समतेचा व बंधुत्वाचा संदेश दिला आहे.


पितरांस श्राद्धान्न

एकदा नाथांच्या वडिलांचे श्राद्ध होते. ब्राह्मणांची वाट पाहत नाथ दारात उभे होते. गिरिजाबाईंचा स्वयंपाक तयार होता. नाथवाडयाबाहेरुन जाणाऱ्या तीन चार हरिजनांस त्या स्वयंपाकाचा सुवास आला. आपल्याला असे अन्न मिळाल्यास किती बरे होईल ही त्यांच्यातील चर्चा नाथांनी ऐकली. ते अन्न हरिजनांस मिळावे असा विचार नाथांच्या मनात उत्पन्न झाला. त्यांनी गिरिजाबाईस ते अन्न हरिजनांस वाटण्यास सांगितले. हरिजनांना श्राद्ध भोजन घातल्याचे पैठणस्थ ब्राह्मणास समजले. नाथांच्या घरी श्राद्धान्न घेण्यास त्यांनी नकार दिला. वास्तविकत: इकडे नाथांनी शुचिर्भूत होऊन गिरिजाबाईं करवी पुन्हा स्वयंपाक करवून घेतला. तथापि ब्राह्मणांनी नकार दिला. श्राद्धविधी वेळेत होणे महत्वाचे होते तेव्हा वाट पाहुन नाथांनी पितृत्रयींच्या ठिकाणी ब्रह्मा विष्णु महेश रुपी पितरांस जेवू घातले व आपले श्राद्ध कार्य पूर्ण केले.

एकच नाथ दोन ठिकाणी

पैठणास राणु नावाचा एक हरिजन गृहस्थ राहत असत. तो व त्याची पत्नी् नित्य नाथांच्या प्रवचनास येत. त्यांचे आचरण शुद्ध होते. नाथांवर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. एकेदिवशी त्यांच्या मनात विचार आला कि आपण नाथांना आपल्या घरी जेवण्यास बोलवावे. त्यांनी नाथांना आमंत्रण दिले ते नाथांनी स्वीकारले. संपूर्ण पैठणभर चर्चेचा एकच विषय कि नाथ हरिजानाकडे जेवणार. ठरलेल्या दिवशी नाथ घरातून बाहेर पडले. काही जण टप्याटप्याने नाथांवर नजर ठेवून होते. नाथ राणूच्या घरी गेले. उभयतांनी नाथांचे मनोभावे पूजन केले. नाथ जेवायला बसले. चमत्कार असा झाला कि, एकाच वेळी लोकांनी नाथांना राणूकडे जेवतांना आणि आपल्या वाडयात प्रवचन सांगताना दिसले. नाथ एकच, वेळ एकच परंतु दोन ठिकाणी दोन भिन्न कार्य हे बघून लोकांनी नाथांचा जयजयकार केला.

मूकं करोति वाचालं

गावोबा हा गोदाकाठच्या कुलकर्ण्याचा मुलगा. पुरणपोळी आवडते म्हणुन रोज दे असा आईजवळ हटट्‍ करी. परिस्थितीमुळे शक्य नसल्याने तिने त्यास नाथांकडे पाठविले. गावोबास नाथांघरी रोज पुरणपोळी मिळु लागली. तो तिथे काम करीत असत. तो थोडा भोळसर होता तरीही नाथांच्या कीर्तनप्रवचनात बसत. त्यास गायत्रीमंत्रही नीट येत नसे. याला नाथांनी मंत्रोपदेश देवू केला तेव्हां "एकनाथ" या शब्दाशिवाय मी दुसरा मंत्र म्हणणार नाही असे त्याने नाथांस सांगितले. नाथांचा भावार्थरामायण नावाचा ग्रंथ युद्धकांडाच्या ४४ व्या अध्यायापर्यन्त आल्यावर समाधी घेण्याचे नाथांनी जाहीर केले अध्याय पूर्ण होण्यास ११ दिवसाचा कालावधी लागत होता. परंतु नाथांनी सांगितले ’मी जरी गेलो तरी राहीलेले रामायण गावोबा पूर्ण करील. नाथांनी विनोद केला असे समजुन लोक हसू लागले. नाथांनी गावोबाच्या मस्तकावर हात ठेवला आणि आश्चर्य गावोबाने नाथांसमोर ४५ वा अध्याय लिहून काढला. नाथनिर्याणानंतर तो ग्रंथ गावोबानेच पूर्ण केला. लिखाणात कोणताही फरक लक्षात येत नव्हता एवढी नाथकृपा गावोबावर झाली.